वाहतूक पोलिसावर हात उचलणारा सोहेल मेमन ड्रग्स रॅकेटमध्ये गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 09:58 AM (IST)
सोहेल मेमन याने 6 ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस रोड येथे ड्युटीवर असलेल्या ट्राफिक हवालदाराला मारहाण केली होती. तो गुन्हाही सोहेलवर दाखल आहे. वाहतूक पोलीस हवालदार कालू मुंढे आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांने कानाखाली मारली होती.
वसई : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटने अंमली पदार्थांच्या कोट्यावधीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. ऑडी गाडीतून ही तस्करी चालायची. यात हाय प्रोफाईल व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात आतापर्यंत एका नायजेरियन नागरीकांसह तीनजणांना अटक केली आहे. तर ट्राफिक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण करणारा सोहेल मेमन हा आणि त्याचा भाऊही आरोपी आहे. महागड्या ऑडी गाडीतून कोट्यावधी किमंतीच ड्रग्सची तस्करी केली जायची. इपीड्रिन नावाचा हा अंमली पदार्थ 21 किलो या गाडीतून मिळाला. ज्याची पोलिसांनी आखलेली किंमत 21 लाख 70 हजार रुपये असली, तरी आतंरराष्ट्रीय बाजारात याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटच्या पोलीस हवालदार सचीन दोरकर आणि प्रदीप पवार यांना खबरीमार्फत अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असल्याची खबर मिळाली. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या टीमनं माणिकपूर हद्दीत सापळा रचला. सोहेल मेमन आणि सरफराज मेमन अटक केलेल्या दोघा भावांची नावे आहेत. तर अंमली पदार्थ घेणारा इसम हा नायजेरियन आहे. उछेन्ना उकपाबी असं त्याच नाव आहे. तिघांनाही मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. सोहेल मेमन याने 6 ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस रोड येथे ड्युटीवर असलेल्या ट्राफिक हवालदाराला मारहाण केली होती. तो गुन्हाही सोहेलवर दाखल आहे. वाहतूक पोलीस हवालदार कालू मुंढे आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांने कानाखाली मारली होती. मात्र हवालदार मुंढे यांनी याबाबत मारहाणीची तक्रारच केली नव्हती. सोशल मिडीयावर मारहाणीची क्लिप वायरल झाल्यावर माणिकपूर पोलिसांनी सोहेलवर पोलिसांना ऑन डयुटी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे ड्रग्स कुठून आणलं होतं, कुठे जाणार आहे, यात आणखी किती जणांचा समावेश आहे, ती ऑडी कार कुणाच्या नावावर आहे आणि वसईत ड्रग्स जाळं किती खोलवर रुतलं आहे, या प्रश्नांची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे. तिन्ही आरोपीना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.