मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने अधिक तपास करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक सेलिब्रिटींची चौकशीही करण्यात आली असून काहींवर अटकेची कारवाईही करण्यात आली होती. अशातच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या संपर्कात असणाऱ्या रिगल महाकाल नावाच्या एका व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील लोखंडवाला, ओशिवारा परिसरात एनसीबीनं छापेमारी करून ही कारवाई केली आहे. छापेमारीत एनसीबीनं मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि रोकडही जप्त केली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाती ड्रग्ज प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. अटक करण्यात आलेला महाकाल हा अनुज केशवानी म्हणजे, जो रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवत होता, त्याला ड्रग सप्लाय करत होता. एनसीबी मिल्लत नगर, लोखंडवालामधील एका घरात छापेमारी सुरु आहे.
पाहा व्हिडीओ : ड्रग्ज प्रकरणी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला एनसीबीकडून अटक
काही दिवसांपूर्वी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर करण्यात आला होता. शौविक चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवणारा पेडलर अनुज केशवानी हा रिगल महाकालकडून ड्रग्स घेत होता. त्यानंतर अनुज केशवानी त्या ड्रग्ज पुढे सप्लाय करत होता, अशी माहिती एनसीबीच्या वतीनं देण्यात आली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच रियाच्या घरी एनसीबीनं छापेमारी करत रियाला आणि तिच्या भावाला अटकही करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी एनसीबीने 20 हून अधिक लोकांना अटक केली आहे. यामध्ये अनेक ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सकडून, तसेच्या त्यांच्या चॅटमधून दीपिका पादुकोन, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांसारख्या सेलिब्रिटींची नावं समोर आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांच्या घरी एनसीबीनं धाड टाकली होती. त्यानंतर भारती आणि हर्ष दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला होता.