मीरा-भाईंदर : जिथं विद्या संपादन केली जाते तिथंच राजकीय मंडळी दारु पार्ट्या करत आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माशाचा पाडा शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.

 
भाजपचे सभापती अनिल भोसलेंनी आपल्या समर्थकांना रविवारी पालिका शाळेच्या आवारात गटारीची पार्टी दिल्याची माहिती आहे. रविवारी शाळा बंद असल्यानं शाळेच्या चाव्या शाळा व्यवस्थापन समितीनं अध्यक्षांकडे दिल्या होत्या. सभापती अनिल भोसलेंचा धाक दाखवून किल्ल्या मागवण्यात आल्या.

 
चाव्या मिळाल्यानंतर डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांची दारु पिऊन झिंगाट पार्टी झाली. या प्रकाराला पालिकेचे शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. आयुक्तांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.