DR. Raghunath Mashelkar On Majha Katta : भारतीय ज्येष्ठ संशोधक पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी संशोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे जगभरात नावलौकिक केला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून येत त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन केले. डॉ माशेलकर यांच्या जीवनात अनेक किस्से आणि अनुभव आहेत जे आपल्याला देखील समृद्ध बनवतात. त्यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या. यावेळी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.
जाहिरात द्यायची कशी? तर अशी...
यावेळी त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला. डॉ माशेलकर हे भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) 1995 ते 2006 या काळात महासंचालक होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्या काळात सीएसआयआरनं 60 वर्ष पूर्ण केली होती. याची जाहिरात माध्यमांमध्ये द्यायची होती. त्यांच्या बैठकीत ही जाहिरात नेमकी कशी द्यायची यावर सखोल चर्चा केली गेली. नंतर 60 वर्षातील 60 विशेष कामगिरींचे फोटो लावावे असं ठरलं. मात्र माशेलकर यांनी याला नकार दिला.
अटलबिहारी वाजपेयी यांनी भरभरुन कौतुक केलं
त्या बैठकीत डॉ माशेलकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, पूर्ण कागद कोरा राहिल. त्यावर एका शेतकऱ्याच्या बोटाचं चित्र असेल. आणि त्यावर मतदानाची शाई लावलेली असेल. या मागे तर्क असा होता की, लोकशाही राष्ट्रात मतदानाचं महत्व आणि शाईचा शोध देखील CSIRनं लावला होता. ही जाहिरात प्रकाशित झाली आणि त्यांचं खूप कौतुक झालं. 60 वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या जाहिरातीचं आणि माशेलकर यांचं भरभरुन कौतुक केलं. हा किस्सा डॉ माशेलकर यांनी माझा कट्टा कार्यक्रमात सांगितला.
'ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे'
माझा कट्टा कार्यक्रमात डॉ माशेलकर म्हणाले की, आपल्याला ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे. मुलांना भरपूर शिकू द्या, त्यांच्या शिक्षणातच त्यांचे भविष्य आहे. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धेला थारा देता कामा नये. आजच्या झपाट्याने बदलत्या युगात नवनवीन शोधांमुळे भविष्याचा वेध घेऊन शिक्षण पध्दतीत करायच्या बदलांचा विचार केला पाहिजे आणि त्यादृष्टीने शाळांमध्ये प्रयोग केले जावेत, असं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान