डॉ. हेमा आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. काल रात्रीच डॉ.हेमाला वैद्यकीय तपासणी साठी पोलिसांनी जेजे रुग्णालयात आणले तिथून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. या प्रकरणात आता फक्त डॉ.अंकिता खंडेलवाल ही आरोपी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. काल रात्री उशिरापर्यंत आगरिपाडा पोलीस या तपासात गुंतलेली होती.
नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मंगळवारी आरोपी डॉक्टर भक्ती मेहेरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी तिनही आरोंपीविरोधात अँटी रॅगिंग अॅक्ट आणि एट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा या दोन आरोपींनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सखोल आणि कडक तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला आहे.
पायलची आत्महत्या नसून तिची हत्या : आई-वडील
पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पायलच्या आई-वडिलांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. दरम्यान, पायलच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे महाजनांनी सांगितले. तसेच युनिट हेडला निलंबित केल्याचे महाजन यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती.
तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता विविध संघटनांच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.