Mahaparinirvan Din 2022 : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम केलं. व्यक्तीला समान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही, असं संविधान त्यांनी दिलं. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे," अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन  (Mahaparinirvan Din). या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमी (Chaitybhoomi) इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर इथल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.


'देशाची दिशा आणि दशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं'
डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. व्यक्तीला सामान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलं. आज आपला देश प्रगती करत आहे कारण लोकशाही जिवंत आहे. 'एक मार्ग एक संधी' संविधानाने उपलब्ध करुन दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे."


'इंदू मिलमधील स्मारकाचा कार्यक्रमही लवकरच होईल'
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल."


बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसंच, डॉ. बाबासाहेबांचं निवास असलेलं राजगृह आणि परळ इथल्या बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तिथेही व्यवस्था करण्यात येते. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.