मुंबई : अखंड महाराष्ट्राबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये. त्यांच्या अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण आलं होतं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र आघाडीच्या अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावर समाधानी असल्याची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.


 

कोणत्याही थराला जाऊ, पण तडजोड नाही

अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे, मात्र त्याबाबत अजिबात तडजोड करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक

वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने आज वेगळीच चाल खेळली आहे. कारण 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन परतलेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.

 

विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना नेते  रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही उपस्थिती लावली.

 

त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या भाषा करणाऱ्या भाजपविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत आपण अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे विधानभवनातून थेट मातोश्रीकडे रवाना झाले होते. इथे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेने रणनीती ठरवली.

संबंधित बातम्या


मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : फडणवीस


मुख्यमंत्र्याच्या निवदेनानंतर शिवसेना मंत्री ‘मातोश्री’कडे रवाना


‘वाघाचं काय झालं, शेळी झाली शेळी झाली’