मुंबई : कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलांना सीबीएसईच्या फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील पालकांना केलं आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

पण पेपर फुटीमध्ये सरकाराचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं मनसे अध्यक्षांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक जारी करुन पालकांनी आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन केलं.

सीबीएसईचा मोठा निर्णय, दहावी, बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार!

तसंच स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
सीबीएसई परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच फुटल्या. हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?

माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.