मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित करु देऊ नये, या सिनेमावर बंदी आणावी, अशी मागणी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.


भारतीय संस्कृतीचं प्रतिक असलेल्या व्यक्तींचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्याची कुणालाच परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे मंगल प्रभात लोढांनी म्हटलं आहे.

“पद्मावती सिनेमामुळे धर्मप्रेमी आणि संस्कृतीप्रेमी हिंदू समाजात मोठा संताप आहे. या सिनेमामुळे सामाजिक भावना दुखावण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील वातावरणही बिघडू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रात पद्मावती सिनेमावर तातडीने बंदी आणली पाहिजे.”, असे मंगल प्रभात लोढा यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे.

मंगल प्रभात लोढांनी पुढे म्हटलंय, “पद्मावती सिनेमावर यासाठीही बंदी आणावी, जेणेकरुन मनोरंजनाच्या नावाखाली इतिहास आणि संस्कृतीचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्याची प्रवृत्ती रोखली जाईल.”

“पद्मावती सिनेमामागे संजय लीला भन्साळी यांचा केवळ व्यावसायिक हेतू आहे. त्यामुळे सिनेमावर बंदी आणली पाहिजे. कारण इतिहासाशी छेडछाड करण्याची कुणालाही परवानगी नाही”, असेही लोढा म्हणाले.