मुंबई : शरद पवारांबाबत केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नका, कोणी इगोवर घेऊ नका, असं वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. एबीपी माझासोबत साधलेल्या संवादात ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यावरुन झालेल्या वादावर भाष्य केलं. 


त्या म्हणाल्या की, "शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभत असते. मी हे भूतकाळात बोलले, ती आठवण करुन दिली. आता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व आहे म्हणून एकी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करायची गरज नाही. पवारसाहेब पितामह आहेत तर उद्धव ठाकरे साहेब अभिमान आहेत."


यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरु आहे. "शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर चित्र काही वेगळंच असतं," असं वक्तव्य करणाऱ्या यशोमती ठाकूर यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे. "यशोमतीताई, मला तर असे वाटते की माननीय पवार साहेबांना UPAचे अध्यक्ष करावं! त्यामुळे तर पूर्ण भारताला उपयोग होईल! देता प्रस्ताव?" असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 


शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करावं यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "हा विषय इगोवर घेऊ नका." 


'पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर...' मंत्री ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर ट्विटर वॉर! नीलम गोऱ्हेंचं जोरदार प्रत्युत्तर


काय आहे प्रकरण?
अमरावतीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक करत म्हटलं की, "पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही."


यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षितच होतं. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट केलं की, "यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत विधान केले आहे की शरद पवार मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. यशोमतीताई, मला तर असे वाटते की पवार साहेबांना UPAचे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पूर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव?" 


या दोन्ही नेत्यांच्या ट्वीटची चर्चा जोरात आहे.