Dombivli Local News Updates: मुंबई : मुंबईची लोकल (Mumbai Local Updates) म्हणजे, चाकरमान्यांची लाईफलाईन. पण याच लाईफलाईनमधील गर्दीनं पुन्हा एक बळी घेतला आहे. कोपर दिवा दरम्यान एका तरुणाचा लोकलमधील गर्दीनं मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या तरुणासोबतच्या प्रवाशी मित्रानं या घटनेबाबत माहिती दिल्याचं कळतंय. केऊर सावळा असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. तरुण लोकलमधून पडल्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेतच टेम्पोनं रुग्णालयात नेण्यात आलं. धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, रेल्वे प्रशासनाला अॅम्बुलन्सबाबत विचारल्यानंतर अॅम्बुलन्स बाहेर गेली आहे, असं उत्तर देण्यात आलं. जर रेल्वेप्रशासनाकडून वेळेत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली गेली असती, तर कदाचित तरुणाचा जीव वाचला असता. 


विकसित भारतचे ढिंढोरा पिटणाऱ्या देशात जखमींना मालवाहू टेम्पोतून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची नामुष्की ओढवल्याची अत्यंत भयावह आणि संतापजनक घटना डोंबिवलीत घडल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीतील नवनीत नगरमध्ये राहणाऱ्या तरुणाचा दिवा स्थानका दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. लोकमधील गर्दीमुळे तरुणाचा तोल गेला, पण सोबत असलेल्या प्रवाशी मित्रानं त्याच्यासाठी हात पुढे केला. मात्र, हात हातातून सुटला आणि तरुण लोकलमधून खाली कोसळला. 


प्रवाशी मित्रानं सांगितलं नेमकं काय घडलं? 


डोंबिवलीतील तरुण पुन्हा लोकलच्या गर्दीचा बळी ठरला आहे. नेहमी प्रमाणे दोन प्रवाशी मित्र काल (गुरुवारी) सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी डोंबिवलीवरून फास्ट लोकलमध्ये नेहमी प्रमाणे गर्दीचा सामना करत मुंबईला खाजगी कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाले. लोकलमध्ये खूप गर्दी असल्यानं कसेबसे कसरत करत बबन शिलकर लोकलच्या डब्यात शिरले आणि मयत केऊर सावळा हे बबनच्या पाठीमागेच लोकलच्या दारात अडकले गर्दीमुळे लोकलमध्ये प्रवेश करता आला नाही.  


बबन शिलकर यांनी केऊर यांना हात दिला, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. बबनच्या हातातला केऊरचा हात सुटला आणि दिवा स्थानकाजवळ केऊर लोकलमधून खाली पडला, मात्र काही प्रवाशांनी त्याला आत घेण्याचाही प्रयत्न केला नाही. केऊर लोकलमधून पडल्यानंतर बबन यांनी दिवा रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. ॲम्बुलन्स केऊर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मागितली. मात्र, ॲम्बुलन्स बाहेर गेली आहे, असं सांगण्यात आलं. केऊरला बेशुद्ध अवस्थेत जवळच असलेल्या रुग्णालयात तीन चाकी टेम्पोमध्ये घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उशीर झाला होता. केऊर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विकसित भारताचा ढिंढोरा पिटणाऱ्या देशात रेल्वे प्रवाशांचा मृत्यू किड्या मुंग्यांसारखा स्वस्त झालाय, असं एकंदरीत चित्र दिसतंय.