मुंबई : मुंबई परिसरात गांजा विक्री करण्यास आलेल्या दोन गांजा तस्करांना मानपाडा पोलिसांनी डोंबिवली ग्रामीण भागातील उंबारली येथून सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे जण गांजाची विक्री करण्यासाठी ओडिसाहून डोंबिवलीला आले होते. फैसल ठाकूर आणि आतिफ अन्सारी अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून 47 लाख 76 हजार रुपये किमतीचा 272 किलो गांजा, एक गाडी, आठ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. 


कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. यामागे आणखी किती जण आहेत? हा गांजा कुठून आणला? कुणाला विक्री केली जाणार होती? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.


डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना काही व्यक्ती डोंबिवली ग्रामीण भागात विक्रीसाठी गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने डोंबिवली ग्रामीण मधील उंबार्ली परिसरात सापळा रचला. यावेळी पोलिसांना एक संशयित गाडी दिसली. पोलिसांनी ही गाडी थांबवून आतील व्यक्तींकडे  विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची  उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला.


पोलिसांना संशय आल्यामुळे गाडीतील दोघांना ताब्यात घेत गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीत 272 किलो वजनाचा गांजा आणि आठ मोबाईल मिळाले. पोलिसांनी तत्काळ हा सर्व मुद्देमाल जप्त केला आणि दोघांना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 47 लाख 76 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


पोलीस तपासा दरम्यान या दोघांनी हा गांजा ओडिसा येथून आणल्याचे सांगितले. हा गांजा छोट्या छोट्या विक्रेत्यांना वितरीत करण्यात येणार होता, अशी माहिती या दोन तस्करांनी पोलिसांना दिली. या प्रकरणात आणखी काही साथीदार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


दरम्यान, हा गांजा मुंबईत कोणाला विक्री करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत पहिल्यांदाच गांजा पकडण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रना सतर्क झाली आहे. कल्याण पोलीस ठाण्याचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.