मुंबई : बटाटावडा म्हटलं तर तोंडाला पाणीच सुटतं. तसेच मुंबईकरांसाठी तर बटाटेवडे म्हणजे जीव की प्राण. अशातच डोंबिवलीत एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. सलग साडेतेरा तासांत शेफ सत्येंद्र जोग यांनी तब्बल 25 हजार बटाटेवडे तळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केल आहे.


डोंबिवली जिमखान्यात सुरू असलेल्या उत्सव या महोत्सवात एक नाही, दोन नाही तर तब्बल 25 हजार बटाटेवडे तळण्याचा विक्रम करण्यात आला आहे. सकाळी 10 ते रात्री 11:30 असे सलग साडेतेरा तास सत्येंद्र जोग यांनी बटाटेवडे तळले. शनिवारी सकाळी 10 वाजता 1500 किलो बटाटे, 500 लीटर तेल, 350 किल बेसन आणि इतर साहित्य घेऊन त्यांनी बटाटेवडे तळण्यास सुरुवात केली. 100 जणांच्या टिमने यासाठी मेहनत घेतली. एका तासाला साधारण 2500 वडे तळण्याचा जोग यांचा मानस होता. हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्यांना 10 लाखांचा खर्च आला आहे.

डोंबिवलीतील अनेक लोकांनी त्यासाठी त्यांना या विक्रमासाठी आर्थिक मदतही केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध शेफ सत्येंद्र जोग यांनी हा उपक्रम सुरु केला असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून या उपक्रमाची नोंद घेतली गेली आहे. सत्येंग्र जोग गेल्या 15 वर्षांपासून उपहारगृह सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये काम केलं आहे. मुंबईची शान असलेल्या बटाटावड्याची ख्याती जगभरात पोहचावी यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. तसेच याबाबत बोलताना बटाटावडा हा मुंबईकरांचा आवडता खाद्यपदार्थ असून त्याला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा विक्रम केल्याचं शेफ सत्येंद्र जोग यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रसिद्ध शेफ सत्येंद्र जोग यांनी तळलेले हे बटाटेवडे आदिवासी पाडे, विटभट्ट्यांवर नेऊन सामाजिक संस्थांना वाटले. रात्री ११.३० वाजता जोग यांचा विश्वविक्रम पूर्ण होताना एबीपी माझा या क्षणाचा साक्षीदार ठरला. विक्रम पूर्ण झाल्यानंतर जोग यांची मित्रमंडळी, परिवार आणि डोंबिवलीकरांनी मोठा जल्लोष केला. तसेच 25 हजार बटाटेवड्यांमधील शेवटचा बटाटावडा जोग यांना खाऊ घालत त्यांचं अभिनंदनही केलं.