मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी केईम रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियात मोठया प्रमाणांत व्हायरल होतं आहे. मागील 24 तासांत आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. हा व्हिडीओ डॉक्टरांबाबत अफवा पसरवणारा व्हिडीओ आहे. सदर व्हिडीओमधील व्यक्ती मृत होता. मशीनवर दिसणारे संगणकीय आलेख हे हृदयाच्या ठोक्याचे नसून कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे आहेत अशी माहिती केईम मार्डचे अध्यक्ष दीपक मुंडे यांनी दिली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ कालपासून जाणूनबुजून व्हायरल करण्यात येतं असल्याचा आरोप देखील डॉक्टरांची संघटना केईएम मार्डचे अध्यक्ष दीपक मुंडे यांनी केला आहे. अशा पद्धतीने कोव्हिडच्या आयसीयू वॉर्डमध्ये येऊन महिला डॉक्टरांना जी धक्काबुकी करण्यात आली याचा निषेध आज केईम रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येऊन नोंदवला आहे. डॉक्टरांनी आज याविरोधात आंदोलन करून संबंधित लोकांवर कारवाई करा अन्यथा आम्हांला संपाचं हत्यार उगरावे लागेल असा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना केईएम मार्डचे अध्यक्ष दीपक मुंडे म्हणाले की, डॉक्टरांवर होणारे हल्ले ही आता नित्याची बाब झाली आहे. असे वारंवार प्रकार समोर येतं आहेत.यामुळे आता डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या कोव्हिडच्या वातावरणात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत जर असे प्रकार समोर येणार असतील तर ही बाब निषेधार्ह आहे.
मंगळवारी केईएम रुग्णालयात एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर 'व्हायरल' झाला आहे. मुळात हा पेशंट अतिगंभीर परिस्थितीत अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आला होता. डॉक्टरांनी त्याला वेळीच उपचार करून कृत्रिम श्वासोच्छ्वासाची नळी म्हणजे इंट्युबेट करून प्रयत्नांची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला. त्याची ईसीजी काढून हृदयक्रिया बंद पडल्याची ईसीजीची 'फ्लॅट लाईन' पेशंटच्या नातेवाईकांना दाखवत आणि वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक ती तपासणी करून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत 'व्हेंटीलेटर' सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून व्हेंटिलेटर वरील लाईन 'फ्लॅट' नसल्याचेही दिसत आहे. मात्र सदर यंत्र हे 'ईसीजी मशिन' नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे 'व्हेंटिलेटर मशीन' आहे. त्यामुळे त्याच्यावर दिसणा-या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाची संबंधित नाहीत ही बाब रुग्णाच्या नातेवाईकांना वारंवार समजावून सांगून देखील त्यांच्याकडून रुग्णालयात गोंधळ घालण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सदर रेषा ही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची लाईन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने पेशंट जिवंत आहे, असा अर्थ होत नाही. जमावाने अतिशय निर्दयपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला अतिशय आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यामुळे आम्ही सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाची हेतुतः बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध 'एफ. आय. आर.' दाखल केली आहे.