कल्याण : बदलापूरजवळ असलेल्या वांगणी येथील डॉ. उमाशंकर गुप्ता याला अखेर बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. गुप्ता वांगणी येथे शिल्पा क्लिनीक नावाने खाजगी क्लिनिक चालवत होता. आपल्याकडे असलेल्या औषधांच्या आधारे कोरोनाची लागण झालेल्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा या डॉक्टरने केला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.


मात्र प्रत्यक्षात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टरला कोणतीही शासकीय किंवा जिल्हाधिकाऱ्याची कोणतीही परवानगी नव्हती. या व्हायरल व्हिडीयो मागची सत्यता एबीपी माझाने समोर आणली होती. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने कोणतीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करणे, कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज डॉ. उमाशंकर गुप्ताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


आज त्याला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केलं होते. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालीयन कोठडीत केली आहे. तसेच रुग्णांना बरं करण्याचा दावा करत असताना तो कोणते औषध वापरत होता, किती दिवसंपासून क्लिनिकमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता, याचा तपास पोलीस आता करत आहेत. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे च्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता.


केवळ ड्रॉपच्या आधारे कोरोनाबाधितांवर उपचार


वांगणी परिसरातील 10  बाय 20 च्या जागेत  डॉ. गुप्ता क्लिनिक चालवत असून त्याने कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी कोणतीही मान्यता न घेताच रुग्णावर उपचार सुरु केले होते. मात्र त्याच्या क्लिनिकमध्ये ऑक्सिजन, आयसीयू ,व्हेंटिलेटरची कोणतीही सुविधा नसून औषधाचे काही थेंब टाकून त्याद्वारे रुग्णाला बरे करत असल्याचा त्याचा दावा करत होता. एकीकडे तज्ञ डॉक्टर करोना रुग्णावर औषध, इंजेक्शन ,गोळ्यांद्वारे उपचार करत रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा डॉक्टर मात्र केवळ ड्रॉप देत रुग्णांना बरं करत असल्याचा दावा करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. चक्क 90 ते 95 टक्के लंग्स इन्फेक्शन असणाऱ्या रुग्णांना बरे केल्याचा दावा करणारा हा डॉक्टर कोरोना नियमावलीचे उल्लंघन करत होता. आपल्या क्लिनिक मध्ये येणाऱ्या नागरिकांना मास्क घालण्यास बंदी घालण्या बरोबरच कोरोना लसीच्या विरोधात त्याने प्रतिक्रिया दिली होती. तर  त्याच्या उपचार पद्धतीवर तज्ञ डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल होतं. हा सर्व प्रकार एबीपी माझाने प्रकाश झोतात आणला होता.