मुंबई : मुंबई महापालिकेने दिवाळी निमित्त पालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार आहे.


महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस 500 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. याचा फायदा 45 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

1 लाख 9 हजार पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे. याशिवाय पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपयांनी जास्त बोनस दिला जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेकडून दिवाळी गिफ्ट:

नवी मुंबई महापालिकेनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपयांचा दिवाळी बोनस गेल्या आठवड्यात जाहीर केला. पालिका कर्माचाऱ्यांसोबतच कंत्राटी कामगारांना देखील 8 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेतील 3 हजार 799 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस :

केडीएमसीतील कायम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा गेल्या आठवड्यात प्रशासनाने केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.