Sada Saravankar vs Shivsainik : धारावीमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. गुरुवारी रात्री धारावीमध्ये सदा सरवणकर आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणी ठाकरे गटातील तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमदार सदा सरवणकर यांची गुरुवारी रात्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. बैठक संपल्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्याने मोठा वाद टळला. या प्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटातील तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय.

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

या प्रकरणी ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटातील 35 ते 40 कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. तर ठाकरे गटातील विठ्ठल पवार यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, देवीच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सदा सरवणकर यांची कार्यकर्त्यांसह बैठक झाली. सभा संपल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. विठ्ठल पवार यांनी सांगितले की, जेव्हा आमच्यावर जातीवाचक शिवीगाळ होते, तेव्हा आम्हीही गप्प बसलो नाही, विरोधही केला. पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी हा वाद आम्ही सुरू केलेला नाही. शुक्रवारी सकाळी 11 वाजता आम्हाला धारावी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं असून तेथे आमचा जबाब नोंदवला जाईल. न्याय मिळाला तर ठीक आहे, पण न्याय मिळाला नाही तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवून या अन्यायाविरोधात आंदोलन करणार असल्याचे उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement

याआधी प्रभादेवीमध्ये झाला होता राडा

सदा सरवणकर आणि ठाकरे गटामध्या याआधी प्रभादेवीमध्ये राडा झाला होता. 10 सप्टेंबर रोजी विसर्जनानंतर हा वाद झाला होता. मुंबईतील प्रभादेवी येथे 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गट भिडले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. प्रभादेवी येथी राडा प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.