Disha Salian Case मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत तत्कालीन व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असे पत्र मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भाजपचे आमदार नितेश राणे यांना पाठवले आहे. त्यामुळे आगामी काळात या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


मुंबई पोलिसांकडून माझ्याशी संपर्क करण्यात आला. दिशा सालियन - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चौकशीसाठी हा संपर्क करण्यात आला. माझ्याकडे  8 जून आणि 13 जूनबाबत अनेक पुरावे आहेत. या सगळ्याबाबत मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. या हत्येतील आरोपी आजही मोकाट विधानसभेत फिरत असल्याचा दावा नितेश राणेंनी केला. सदर प्रकरणावर आदित्य ठाकरेंना विचारले असता काही लोकांबद्दल आम्ही बोलत नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.


आदित्य ठाकरेंनाही सोडणार नाही- नितेश राणे


नारायण राणे आणि माझी पोलीस ठाण्यात चौकशी झाली. त्यावेळी ठाकरेंकडून पोलिसांना वारंवर फोन येत होते. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियानवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.  8 जूनला आदित्य ठाकरे कुठे होते? ते आजोबा आजारी असल्याची कारणं देत आहेत. रोहन रायला कोणी गायब केलं? मस्टरवरील एन्ट्री कोणी फाडली?ना आम्ही पुण्यातल्या अग्रवालला सोडणार, ना आम्ही मिहीर शहाला सोडणार ना आम्ही आदित्य ठाकरेंना सोडणार. दिशा सालियानचा शवविच्छेदन अहवाल कुठे आहे? काय झालं तेव्हा..? वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या बाहेर कोणाचा बंगला आहे? १३ जूनला कोणाचा वाढदिवस होता? कुणाची पार्टी झाली? तिथून सुशांतच्या घरी कोण गेलं?, असे अनेक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.


काय आहे प्रकरण? 


दिशा सालियन हिचा मृत्यू  8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. 


संबंधित बातमी:


Disha Salian Case: मोठी बातमी : दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांची चौकशी, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?