Governor Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात आल्यापासूनच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वादग्रस्त वक्तव्यांनी ओढवून घेतलेले वाद असे समीकरणच झाले आहे. मराठी माणसांच्या अस्मितेवर घाव घालणारी वक्तव्ये करून संतापाला वाट मोकळी करून दिलेल्या कोश्यारी यांचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे.
काल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अंधेरीमधील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचे नामकरण आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचं नाव देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
मात्र, अजून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारच झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारीचा कार्यक्रम सुरुच असून अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा थेट उल्लेख असलेल्या कोनशिलेचे अनावरण घटनात्मक पदावर असलेल्या राज्यपालांनी कसे काय केले? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या कार्यक्रमाला अमरावतीचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, भाजप आमदार नितेश राणे यांच्यासारखे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राज्यपालांकडून वादग्रस्त वक्तव्ये
या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी समाजाची जाहीरपणे तळी उचलताना मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती, राजस्थानी लोकांचं योगदान असल्याचे म्हणाले. गुजराती, राजस्थानी गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली.
राज्यभरात राज्यपालांविरोधात उद्रेक
राज्यपालांनी उधळलेल्या मुक्ताफळानंतर आज राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली, पण बंडखोर शिंदे गटाला आणि भाजपला सावध भूमिका घेऊन प्रतिक्रिया द्यावी लागली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आल्याचे सांगत कडाडून हल्ला चढवला. राज ठाकरे यांनीही निवडणुकीच्या तोंडावर असले उद्योग करू नका असे सांगत राज्यपालांना फटकारले आहे.