कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला सत्ताधारी भाजपच्या राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. घरत उपयुक्त असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी शिफारस केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण हे घरतचे गॉडफादर होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


संजय घरतला काल (बुधवार) अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं. शिवाय त्याच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात केलेले अनेक घोटाळ्यांचे आरोपही पुन्हा एकदा चर्चेत आले होते. याचदरम्यान घरत हा 2015 साली केडीएमसीचा उपयुक्त असताना त्याची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नेमणूकही चर्चेचा विषय बनली आहे. कारण त्याची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी डोंबिवलीचे तत्कालीन आमदार आणि सध्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी शिफारस केल्याची बाब समोर आली आहे.

35 लाखांची लाच मागितली, केडीएमसीचे उपायुक्त रंगेहाथ अटक

याबाबतचा पुरावाच एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे घरतचे गॉडफादर होते का? आणि त्याच्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये चव्हाण यांचा त्याला आशीर्वाद होता का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

दरम्यान, संजय घरत आणि त्याच्यासोबत पकडण्यात आलेले लिपिक ललित आमरे तसंच भूषण पाटील या तिघांच्याही घरावर काल रात्री एसीबीने छापे टाकले, ज्यात घरतच्या घरातून काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह केडीएमसीच्या काही फाईल्सही एसीबीच्या हाती लागल्याचं समजतं. घरत याच्या केडीएमसीतल्या केबिनला असलेल्या सुरक्षेचा मुद्दाही यानंतर समोर आला आहे. महापालिकेत फक्त घरत यांच्याच एकमेव केबिनला कार्ड पंच करुन प्रवेश होता. त्यामुळे या केबिनमध्ये असं नेमकं काय होतं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.