मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी (Dharavi). गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास (Dharavi Redevelopment) रखडला असून अखेर अदानी समूहाकडून (Adani Group) पुनर्विकास होणार आहे. मात्र या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाची मशाल पुन्हा एकदा पेटली आहे. 


धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. गेल्या 19 वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडलेला आहे. मात्र आता अदानी समूहाला या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने पक्के करून धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे मार्गी लागण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत . मात्र हा प्रकल्प अदानीला देण्यावरून सध्या काही राजकीय पक्षांकडून विरोध होतोय. काहींकडून समर्थन केले जातंय. यात धारावीकर मात्र या दोन्ही बाजूच्या बाजू ऐकल्यानंतर संभ्रमात आहे आणि फक्त धारावीचा विकास व्हावा अशी भावना प्रत्येक धारावीवासियांची आहे.


अदानी समूहाकडून पुनर्विकास होणार


उंबरठ्यापासून 20 पावलं चालत नाही तोपर्यंत समोर भिंत येईल एवढंच घर. खरं तर ‘घर’ फक्त इथल्या चार भींतीत राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगासाठी ती झोपडीच. आणि अशा काही मोजक्या नाही तर हजारो झोपड्या म्हणजे ‘धारावी’. याच धारावीचा आता अदानी समूहाकडून पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून आता या भागांमध्ये सर्वेक्षण करायला देखील सुरुवात झालीये.  मात्र हे होत असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्षांकडून याला कडाडून विरोध होत आहे. याप्रकरणी, अद्याप मोर्चाचा परवानगी मिळाली नसली तरीही धारावी बचाव आंदोलनावर  कार्यकर्ते ठाम आहेत. 


ठाकरे गटाचा विरोध


मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास 567 एकर वरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे. धारावीतल्या 60 हजारहून अधिक झोपड्यांमध्ये 10 लाख हून अधिक लोक राहतात. शिवाय, 13 हजारहून अधिक लेदर, मातीच्या वस्तू, टेक्स्टाईल, गारमेंट आणि शेकडो छोटी-मोठी विविध प्रकारचे लघुउद्योग धारावीत आहेत. मुंबईत धारावी मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे. याच धारावीचा पुनर्विकास आता होणार आहे.मात्र होत असताना उद्धव ठाकरे गटाने आणि काही राजकीय पक्षांनी आता या विरोधात एक लढा उभारलाय.


धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता विरोध का?


ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्षाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता विरोध का होतोय या विषयी सविस्तर जाणून घेऊयात. घर देताना कोणतीही दोन कॅटेगरी असू नये.धारावीतील प्रत्येक झोपडपट्टी धारकाला 405 स्क्वेअर फुट चे घर द्यायला हवं. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये झोपड्यांचे पात्र आणि अपात्र निकष 1 जानेवारी 2000 सालचे आहेत. मात्र धारावीकरांची मागणी आहे नवीन लेटेस्ट सर्वे करण्यात यावा. धारावीतील पुनर्विकास प्रकल्पामध्ये लघुउद्योगधारकांसाठी धोरण स्पष्ट नाही. धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांना दहा किलोमीटरच्या परीक्षेमध्ये पुनर्वसन केलं जाईल मात्र त्यांनाही याच पुनर्विकास प्रकल्पामध्ये सामावून घ्यायला हवं.


घरातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी स्पष्ट तरतूद या विकास प्रकल्पत नाही,ती करावी. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रक्रियेमध्ये धारावीतील लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प होत असताना त्याचा सुरुवातीला विकास आराखडा जाहीर करावा. 100% पैकी 25% वर विकास करून बाकीची जागा काय करणार? अदानी समूहाकडून होणारे जबरदस्तीचे सर्वे होऊ नये, अशा मागण्या अग्रस्थानी आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांकडून सध्या या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध होतोय.  


राज्य सरकार व आगामी समूहाकडून धारावीचा पुनर्विकास होत असताना कोणतीही स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळेच धारावीच्या संरक्षणासाठी आणि धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्ष अदानी समूहाच्या वांद्रे येथील कार्यालयावर 3 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार आहेत.


हेही वाचा :


Adar Poonawalla London Mansion : 'पुणेकर' अदर पुनावाला लंडनमध्ये मुकेश अंबानींपेक्षाही महागडं 'घर' खरेदी करणार! किती हजार कोटींमध्ये व्यवहार झाला?