मुंबई: मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्कील झालंय. आणि त्यात आता धनगर समाजाची भर पडणार आहे. कारण उद्या पुण्याच्या दुधाने लॉनवर राज्यभरातील धनगर एकत्र येणार आहेत. आणि धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करा, या मागणीसाठी आंदोलनाची हाक देणार आहेत.
धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर 5 लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजानं दिला आहे.
आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र 4 वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवलं आहे.
माहिती अधिकार
धनगर समाजानं 36 जिल्हे आणि 385 तालुक्यातील तहसीलदार, समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून धनगड लोकसंख्या किती अशी माहिती मागवली.
माहिती अधिकारात राज्यातील 36 जिल्ह्यात एकही धनगड अस्तित्वात नसल्याचं समोर आलं.
याच आधारावर धनगर समाजानं आदिवासी मंत्रालयात माहिती अधिकारातून 9 अर्ज केले, आणि धनगडांची माहिती मागवली. ज्यात 1981 साली राज्यात 72 हजार धनगड होते.
1991 साली 97 हजार
2001 साली 28 हजार
तर 2011 साली 48 हजार धनगड होते असं सांगण्यात आलं
आता तहसीलदार, समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती नसलेल्या धनगडांची नावं, पत्ते आणि गावांची माहिती द्या अशी मागणी धनगर समाजानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
धनगरांना 70 वर्ष आदिवासींचं आरक्षण नाकारुन दिवासी समाजानं धनगरांच्या वाट्याच्या सुविधा लाटल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला.
आरक्षणासाठी मराठा, मुस्लिम आक्रमक झालेत. धनगरांना आदिवासींमध्ये जायचंय. अंगणवाडी सेविका, पीएचडी धारक, शेतकरी असे एकापाठोपाठ एक आंदोलन करतायत.
मुख्यमंत्री वेळ मारुन नेत आहेत. इतर मंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत. विरोधक वेट अँड वॉचवर. राज्य असं चालत नसतं, आणि राज्यकर्ते असे नसतात इतकंच. !
*कोणत्या मुद्द्यांआधारे आरक्षणाची मागणी?*
*बॉम्बे रजिस्ट्रेशन अक्टमध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख
*प्रत्येक राज्यात उच्चार धनगर असो किंवा धनगड, अर्थ समान असल्याचा दावा
*वर्षानुवर्षे धनगरांचा मेंढीपालनाचा व्यवसाय
*नृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती
*मानववंश शास्त्र आणि सामाजिक दृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा उल्लेख
*समाजाचा समावेश आदिवासी जमातीत का नाही, असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला
*बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत
संबंधित बातम्या
धनगर की धनगड, शब्दातील घोळामुळे आरक्षण रखडलं
आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, 5 ऑगस्टला पुढचं धोरण ठरवणार!
धनगर आरक्षण: फडणवीससाहेब, त्या आश्वासनाचं काय झालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2018 04:08 PM (IST)
आघाडी सरकारच्या काळात धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला तेव्हा फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -