मुंबई: भाजप आमदार अनिल गोटे यांच्या विधानपरिषद बरखास्तीसंबंधी वक्तव्याचा आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला. अनिल गोटेंकडून ही मागणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे अनिल गोंटेच्या मागचा बोलविता धनी नेमका कोण आहे? असा सवालही त्यांनी विचारला.
‘कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ही अनिल गोटे यांचं विधानपरिषदेचं अवमान करणारं वक्तव्य सुरुच आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी खालच्या सभागृहाचा सभात्याग केला. वरच्या सभागृहाचा अडथळा ठरू नये म्हणून वारंवार अशी मागणी करायला लावली जाते आहे का? अशी शंका उपस्थित होते. नेमकं गोटे यांच्या या वक्तव्यामागचा बोलवता धनी कोण आहे? हे समोर येणं गरजेचं आहे.’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी अनिल गोटेंचा समाचार घेतला.
दरम्यान, विधानपरिषदेत शिवसेनेनं देखील या प्रकरणी आवाज उठवला. शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी याबाबत विधानपरिषदेत गोटे यांच्यावर हक्कभंग आणू शकतो का? अशी विचारणा केली. ‘सभापतींनी दिलेल्या निर्देशांचा अवमान केल्यामुळे अनिल गोटे यांच्याविरोधात हक्कभंग स्वतः सभापती आणू शकतात का? किंवा आम्ही हक्कभंग आणू शकतो का? यावर मार्गदर्शन करावं.’ असं परब म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील अनिल गोटेंवर हल्लाबोल केला. ‘सभागृहात सदस्यांचं वर्तन अयोग्य असल्याने त्यांचं निलंबन होतं. मग तिसऱ्यांदा विधानपारिषदेबाबत अवमानकारक विधान केलं जात आहे यावर कारवाईसाठी घटनेत तरतूद आहे की नाही हे स्पष्ट करावं?’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
या सर्व प्रकारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिलं. ‘अनिल गोटे यांचं वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात आलं आहे. सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः या मताचा आहे की दोन्ही सभागृहाच्या सार्वभौमत्व अबाधित राहावं आणि अवमान होईल असं कुठलंही वक्तव्य करणं अयोग्य आहे. यापूर्वीसुद्धा गोटे यांना नोटीस बजावण्यात आली होती. आज नेमकं काय घडलं याची पूर्ण माहिती घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या:
पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन: आ. अनिल गोटे
‘त्या’ विधानाबाबत स्पष्टीकरण द्या, आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस
अनिल गोटेंचं वक्तव्य सभागृहाच्या उंचीला न शोभणारं: मुख्यमंत्री