मुंबई : एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

“मोपलवार प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला दिले असतानाही, आजपर्यंत चौकशी झाली नाही. याउलट मोपलवारांना मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील प्रकल्पावर मुख्य अधिकारी म्हणून नेमले गेले. याचाच अर्थ मोपलवार कितीही भ्रष्टाचारी असले तरी आम्हाला चालतात, हे दाखवून भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं सांगणारं सरकार आज उघडं पडलं आहे.”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.

दरम्यान, मोपलवारांना केवळ पदावरुन दूर करु नका तर त्यांना निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मोपलवारांवर सेटलमेंटचे आरोप

मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आलं. मात्र राधेश्याम मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप असल्याची बातमी 'माझा'नं दाखवल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.