मुंबई: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पंतप्रधान मोदी यांनी अवघ्या आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाच्या कार्यक्रमात शिवरायांच्या या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यामुळे या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जावरुन महायुती सरकार कोंडीत सापडले होते. राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारल्याचे स्पष्टीकरण दिला असला तरी महाविकास आघाडीने या मुद्द्यावरुन महायुती सरकारचा अक्षरश: पिच्छा पुरवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याचठिकाणी नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.  अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पंचनामा


राजकोट किल्ल्यावरती कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मंगळवारी सकाळी  पंचनामा सुरू करण्यात आला. पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक एक्सपोर्टच्या माध्यमातून हा पंचनामा करण्यात आला. साधारण दीड तासाने नौदलाचे दोन अधिकारी याठिकाणावरुन पाहणी करुन बाहेर पडले. त्यानंतरही सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधील तज्ञांकडून पंचनामा सुरू होता. आत गेलेल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून स्मारकाच्या ठिकाणचे मोजमाप आणि इतर बाबींची नोंद घेण्यात आली. 


याबाबत प्रसारमध्यमांशी बोलताना फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले की, घटनास्थळावरून पुतळ्याचे अवशेष आम्ही जमा केलेले आहेत. ते आता पुढे पाठवले जातील आणि त्यानंतर त्याबाबतचा अहवाल येईल. हा अहवाल येण्यास किती दिवस लागतील? हे मात्र आम्ही सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया फॉरेन्सिक तज्ञांनी दिली. 


कृष्णाला मानणारेच 2024 ला विधानसभेची हंडी फोडणार: फडणवीस


जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार. महाविकास आघाडीचे थर बिथरले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकारण करु नये. मालवणमध्ये याहीपेक्षा मोठा पुतळा बसवू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात 100 टक्के भ्रष्टाचार, कमिशन मागितल्याशिवाय... जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरेंनी ताशेरे ओढले