मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडलेल्या पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही विरोधकांना त्वेषाने प्रत्युत्तर दिले. पेपरफुटीबाबत (Paper Leak) घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरवले जात आहे, यामध्ये मोठा फरक आहे. मला आता राजकारण करायचं नाही, नाहीतर मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशाप्रकारे फुटलं याची जंत्री मी आणली आहे. पण मी त्याबाबत बोलणार नाही. पण विरोधी पक्षाकडून अशाप्रकारची बेताल वक्तव्यं केली जातात तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकरभरती झाल्याचा दावाही केला. आपण 75 हजार नोकरभरतीचे लक्ष्य ठेवले होते. आमचे सरकार आल्यानंतर 57, 422 नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तसेच ज्यांची परीक्षा पूर्ण झाली, कागदपत्रे पूर्ण झाली अशांची संख्या 19853 इतकी आहे. ही एकूण संख्या 77, 305 इतकी आहे. ही सगळी पदं कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेली. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणखी 31,201 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
टीसीएसच्या केंद्रावर परीक्षा न झालेल्या ठिकाणी पेपर कसा फुटला, फडणवीस म्हणाले...
अंतिम रिपोर्टनुसार संबंधित विद्यार्थी 100 पैकी 48 प्रश्नात पास आहे, बाकीची उत्तरं चुकली आहेत. पॅटर्नमधील काही उत्तर खऱ्या उत्तराशी जुळत असल्याने कारवाई केली आणि परीक्षा रद्द केली. त्यामुळे आपण नवीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात टीसीएस कंपनीने विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहता, काही ठिकाणी इतर केंद्र ताब्यात घेऊन परीक्षा घेतल्या. त्यापैकी एका केंद्रावर हा प्रकार घडला होता. मात्र, आगामी काळात परीक्षा या टीसीएस कंपनीच्या केंद्रांवरच होतील, असे देवेंद्र फडणवी यांनी सांगितले.
तलाठी भरती का रद्द केली, देवेंद्र फडणवीस म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी तलाठी भरतीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, तलाठी पेपरभरती पेपर फुटला नाही, उत्तराची पद्धत चुकली होती. त्यामुळे परीक्षा रद्द केली. उत्तर चुकलं असेल तर समान मार्क दिले जातात, त्यावर ओरड झाली , त्यामुळे पेपर रद्द केला, असे फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा