मुंबई : मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना पहिले दोन दिवस त्या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये असा त्यामागे उद्देश होता असा आरोप त्यावर करण्यात आला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. पहिल्या दिवशी काही लोकांना त्या ठिकाणी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली असं मुख्यमंत्री म्हणाले. आता दुकाने उघडी आहेत आणि राहतील असंही ते म्हणाले.
काही जणांनी धुडगूस घातल्याने दुकानं बंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काही लोकांनी धूडगुस घातला, त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली. यावर आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला. कुणीही त्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले नव्हते. काही लोकांनी धुडगूस घातल्यानंतर व्यापाऱ्यांनी तसा निर्णय घेतला. नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही त्या ठिकाणी पोलीस फोर्स ठेवतोय. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी ठेवली आणि आताही ती उघडी आहेत."
आंदोलनाच्या दरम्यान काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आंदोलकांचा आरोप काय?
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदान परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. त्यामुळे आंदोलकांची मोठी हेळसांडही झाल्याचं दिसून आलं. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.
आंदोलकांची कोंडी करण्यासाठी, त्यांना अन्न-पाणी मिळू नयेत यासाठी सरकारने हा आदेश दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पोलिसांचे तसे आदेश असल्याचं सांगत त्यांनी एक चिठ्ठीही शेअर केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनीदेखील त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आंदोलकांच्या वकिलांनीही त्याचा उल्लेख न्यायालयात सुनावणी सुरू असताना केला. राज्य सरकारने आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप वकिलांनी केला.
दुसऱ्या दिवशापासून ओघ सुरू
व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवल्याने आंदोलकांना अन्न आणि पाण्याची उपलब्धता होत नव्हती. याची माहिती मिळताच राज्यभरातून मुंबईकडे मदतीचा ओघ सुरू झाला. अनेक ठिकाणाहून भाकरी, चटणी, लोणचे यासह खाद्यपदार्थांची आवक सुरू झाली. दोन दिवसानंतर हळूहळू व्यापाऱ्यांनीही दुकानं सुरू केल्याचं दिसून आलं.
उद्या चार वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मनोज जरांगे यांना यापुढे आंदोलन सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत, त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलावीत. उद्या सायंकाळी चार वाजेपर्यंत रस्ते रिकामे करावेत असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावेत असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
ही बातमी वाचा: