Vaibhav Khedekar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्ष प्रवेशाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे काही दिवसांपूर्वी वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे खेडेकर आता काय भूमिका घेता याकडे गेल्या काही दिवसांपासून कोकणाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले होते. अशातच ते भाजपमध्ये (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आणि पक्ष ठरला आहे. मनसेतून बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकर हे येत्या 4 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थिती ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. नितेश राणे खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार भाजपमध्ये प्रवेश

पक्षाला शून्यापासून गावागावात पोहचवण्याचे काम वैभव खेडेकर यांनी केलं आहे. मात्र पक्षाची कारवाई झाल्यावर आमच्यासोबत काम करण्याचा विचार असेल तर सांगा, असे मी वैभव खेडेकर यांना विचारलं. त्यानुसार वैभव खेडेकर यांचा 4 सप्टेंबर रोजी मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, वैभव खेडेकर यांच्यासोबत मनसेनेचे बडतर्फ झालेले संतोष नलावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये पक्ष प्रवॆश करणार आहेत. त्यामुळे कोकणात भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे. कोकणच्या विकासासाठी वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मनसेतून हकालपट्टी करताच सर्वात आधी कोणी फोन केला?

तर पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांनी त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर सर्वात आधी कुणाचा फोन आला याबाबत देखील वक्तव्य केले. ते म्हणाले की बडतर्फ झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिला फोन नितेश राणे यांचा आला, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी मला धीर दिल्याचे देखील वैभव खेडेकर म्हणाले. वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन. माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याची ही वेळ आहे. झालेली घटना नाकारता येत नाही. हे स्वीकारून मी पुढे जाईल. मला अजिबात घाई नाही. मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईल. मी लवकरच मेळावा घेणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशी टीका वैभव खेडेकर यांनी पक्षाच्या धोरणावर केली.

आणखी वाचा 

Vaibhav Khedekar : मोठी बातमी: वैभव खेडेकरांच्या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी आदेशच काढला; मनसेतून 4 जणांची हकालपट्टी