मुंबई : महाविकास आघाडीचं लवकरच विसर्जन होणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सातत्यानं भाकीत करणाऱ्यांचे स्वतः फडणवीसांनीच आज कान टोचले. राणे, आठवलेनंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत केल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी स्वकीय यांना लगावला.


दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात ते बोलत होते. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांना गदा भेट दिली. त्यावर याचा प्रहार फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्या आमच्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची असून सत्तेत येणं हा गौण भाग असल्याचं सांगत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.


नारायण राणे, रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत केलं होतं. त्यामुळे नारायण राणे आणि रामदास आठवले यांना विचारुन त्यांच्या मनातला सत्ता विसर्जनाचा मुहूर्त विचारुन घेईल.


राज्यातील वीजबिल वाढीच्या विषयावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. आजही अवाजवी बिलं रुग्णांना दिली जात आहेत. बिलांचं कॅपिंगची फाईल प्रलंबित आहे, ती का प्रलंबित आहे, कुणी थांबवली आहे याचा खुलासा झाला पाहिजे.


विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये, असं आवाहन फडणवीसांनी केलं. मंदिरं तात्काळ उघडली पाहिजेत. सरकारने दारुची दुकानं उघडली त्याच्या 50 टक्के घाई मंदिरं उघडताना दाखवली पाहिजे. दारुमुळे कोरोना होत नाही आणि मंदिरांमुळे होतो असं समजण्याचं काही कारण नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.