Devendra Fadnavis Live Speech In Maharashtra Vidhan Sabha : आज राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पुन्हा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर हल्लाबोल केला. फोन टॅपिंग प्रकरण आणि त्यांची झालेली चौकशी यावरुन त्यांनी सरकारला पुन्हा आव्हान दिलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीसंदर्भात निवेदन केलं. यानंतर फडणवीस म्हणाले की, राजकीय वळण या प्रकरणाला येतंय हे माझ्या लक्षात आलं. पण मी घाबरत नाही.  मी कुठून येतो हे यांना माहिती नाही. माझ्या वडिलांवरती कोणताही गुन्हा नसताना इंदिरा गांधी यांनी त्यांना दोन वर्ष आणि काकूंना अठरा महिने जेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळं आम्ही जेल वगैरेला घाबरत नाही, असंही फडणवीस म्हणाले. 


फडणवीस म्हणाले की, मला प्रश्नावली पाठवल्यानंतर मी लेखी उत्तर देत प्रश्नावलीची उत्तरं देणार असल्याचं सांगितलं होतं.  प्रश्नावली मध्ये विचारले प्रश्न हे  साक्षीदार म्हणून होते.  काल विचारलेले प्रश्न हे आरोपी म्हणून होते. मला प्रश्न विचारला की, तुम्ही ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचा भंग केला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात का? ही प्रश्नावली जाणूनबुझून कुणीतरी बदलली असं फडणवीस म्हणाले. 


Phone Tapping Case: फोन टॅपिंग प्रकरणात कोणालाही फसवण्याचा प्रयत्न नाही, वाद थांबवावा; वळसे पाटील यांचे आवाहन


मी व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी सुरक्षित आहे. मी अतिशय जबाबदारीने वागलो. माझ्याकडे ट्रान्सस्क्रिप्ट होत्या. कुणाची ट्रान्सस्क्रिप्टमधून बदनामी होऊ शकते म्हणून मी त्या केंद्रीय गृहसचिवांना दिल्या. माझ्य़ाकडं ट्रान्सस्क्रिप्ट होत्या ज्या तुमच्या मंत्र्यांनी प्रेसला दिल्या, असं फडणवीस म्हणाले. 


पोलीस अधिकाऱ्यावर हक्कभंग आणण्याची मागणी


भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा मुद्या उपस्थित केला. सभागृहातील सदस्यांच्या विशेषाधिकाराचे हनन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेत्यांची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हक्कभंग आणण्याची मागणी त्यांनी केली. तर, माहितीचा स्रोत उघड न करण्याचा विरोधी पक्षनेत्याचा अधिकार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले. सभागृहातील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.