Maharashtra Assembly Session 2022 : महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी 125 तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार काहीसं बॅकफूट गेलं असल्याचे चित्र होते. रविवारी, पोलीस बदली कथित घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी दोन तास चौकशी केली. फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर, फडणवीस यांना याआधी 6 वेळेस नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला असल्याची माहिती सरकारने दिली.
फडणवीसांच्या आरोपांवर गृहमंत्री आज उत्तर देणार?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेल्या आरोपांबाबत आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देण्याची शक्यता आहे. गृहमंत्री मागील आठवड्याच्या गुरुवारी सभागृहात निवदेन सादर करणार होते. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार, त्यांनी हे निवेदन पुढे ढकलले. त्यानंतर आज गृहमंत्री सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पावर बोलण्याची शक्यता आहे.