मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका लग्न सोहळ्यात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांची (prasad purohit) भेट घेतली. पुरोहितांविरोधात अद्याप एनआयए कोर्टात सुरू असलेला मालेगाव ब्लास्ट खटला प्रलंबित आहे. त्यामुळे या व्हिडीओमुळे काँग्रेसनं आता फडणवीसांवर टीका करायला सुरूवात केली आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका लग्न सोहळ्यात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची भेट घेतली. भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. देवेंद्र फडणवीस भाजपच्या इतर नेत्यांसोबत बसले असताना प्रसाद पुरोहितांनी समोर येऊन त्यांची भेट घेतलेली इथं स्पष्ट पाहायला मिळतेय. हा व्हिडिओ व्हायरल होताच सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षानं त्यावर आपला आक्षेप नोंदवला आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे मालेगाव ब्लास्ट केस 2008 मधील प्रमुख आरोपींपैकी एक असून ते सध्या इतर आरोपींप्रमाणे जामीनावर बाहेर आहेत. भारतीय लष्करानं त्यांना पुन्हा सेवेतही सामावून घेतलंय. मात्र याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेला खटला अद्याप प्रलंबित आहे. ज्यात त्यांच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत देशविघातक कारवाईत सहभाग, देशाविरोधात युद्ध पुकारणे, समाजात जातीय तेढ निर्माण करणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेत.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. अभिनव भारत या कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनेनं हा ब्लास्ट घडवून आणला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात यूएपीए कायद्यानुसार मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ही सर्व पार्श्वभूमी असताना राज्यातील इतक्या मोठ्यानं खाजगी सोहळ्यात ही भेट घेणं म्हणजे चर्चेचा विषय ठरणारी गोष्ट आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यूपीए कायदा अंतर्गत आरोपी असलेल्या एका व्यक्तीसोबत भेट घेतलाचा व्हिडीओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा द्वारे ट्वीट करण्यात आला आहे . यामध्ये सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, 'यह रिश्ता क्या कहलाता है, बहुत याराना लगता है' असे म्हणत मालेगावमधील बॉम्ब स्फोटाच्या घटनेचा सर्व ठिकाणी निषेध करण्यात आला. त्या घटनेच्या आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना संसदेमध्ये पाठवण्याचे काम भाजपनं केलं. त्यामुळे भाजपचे यूपीएमधील किती लागेबांधे आहेत हे यामधून दिसून येत आहे असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
यावर एबीपी माझाशी बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं की, प्रसाद पुरोहित हे माझे मित्र आहेत. अजून त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha