मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही वृत्तपत्रात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याअनुषंगाने कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे. वस्तुत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 25 नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यतेसाठी कालपर्यंत 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास 495 प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा 192 प्रकरणात रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरुन संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी 87 प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे 9 प्रकरणे पाठविण्यात आली आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने 288 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित 207 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून 106 प्रकरणात थेट रुग्णालयांकडे मदत वितरीत केली आहे. उर्वरित प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. 50 प्रकरणात अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरु करण्याबाबतही कार्यवाही सुरु आहे, असेही सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेऊ नका : संजय काकडे
Cabinate Expansion I ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 23 डिसेंबरला होणार? I एबीपी माझा