Fadnavis & Thackeray : भाजप आणि सेना युती तुटल्यानंतर, तसेच एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंड आणि त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संबंधांमध्ये वितुष्ट आले. गेल्या काही महिन्यांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका ही केली आहे, एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मित्रत्त्वाच्या नात्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला. मात्र अनेक दिवसांनंतर या दोन्ही नेत्यांचे वेगळचे चित्र विधानभवनात आज (23 मार्च) पाहायला मिळाले.
ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवता एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधिमंडळात गेले. त्यामुळे अनेक चर्चा उधाण आले आहे.
आता कोणाला हाय, हॅलो म्हणणंही पाप झालंय का? उद्धव ठाकरे
यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआडची चर्चा फलदायी होते असं म्हणतात. कदाचित आमची कधीतरी बंद दाराआड चर्चा झालीच तर तेव्हा बोलू. मी आणि ते एकत्र गेटमधून प्रवेश करतो त्यावेळी एकमेकांशी आपण रामराम, हाय हॅलो करतो तसंच केलं. आता कोणाला हाय हॅल म्हणणंही पाप झालंय का किंवा काही हेतूपुरस्सर ते करावं का?"
राजकीय सत्तासंघर्षामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारतानाचे चित्र अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. त्यामुळे विधानभवनाच्या आवारात घडलेल्या या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. मात्र विरोधक म्हणतात त्यामुळे शिंदे गटाला धास्ती आहे.
एकत्रित आले हा योगायोग असेल. खरंतर राजकीय चर्चा यावर होणारच. मी याबाबत आम्हाला चिंता करण्याची गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जो दुसरा गट आहे, त्याने चिंता करावी. मी एवढंच म्हणेन की हा योगायोग आहे, यावर राजकीय भाष्य करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले.
आधी आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन मजेशीर संवाद, आता फडणवीस-ठाकरे यांच्या हसतखेळत गप्पा
दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यातही लग्नावरुन मजेशीर संवाद पाहायला मिळाला होता. यानंतर आता दोन दिवसांतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत गप्पा मारताना दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र आगामी काळात काही राजकीय बदल घडू शकतो का या संदर्भात आताच काही सांगता येऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक देतात.
आजची भेट वैयक्तिक की आगामी राजकारणासाठी?
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकारण टिकवायचं असेल तर वैचारिक मतभेद दूर ठेवून नेत्यांनी वैयक्तिक जवळीक ठेवणे हे चांगलं आहे, असं राजकीय जाणकाराचे म्हणणे आहे. त्यामुळे आजची भेट ही भेट ही वैयक्तिक होती की आगामी राजकारणासाठी हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.
संबंधित बातमी