मुंबई :  लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.  मातोश्रीवरील चर्चेत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्वव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अल्टीमेटम दिला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले.
काय झालं आजच्या बैठकीत ? 

सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना लोकसभेसह विधानसभा निवडणुकीसाठी 50:50  जागांच्या मागणीवर ठाम आहे. या दोन्ही मागण्या विशेषतः लोकसभेच्या अर्ध्या-अर्ध्या जागावाटपाची सेनेची मागणी भाजपला मान्य होण्याची शक्यता कमी आहे. तसंच युती फक्त भजपशी होणार असून मित्रपक्षांशी नाही असे सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्वाचे म्हणजे मित्रपक्षांना भाजपने सोडलेल्या मतदारसंघातूनही सेनेचा उमेदवार लढणार असल्याची शक्यता आहे. समान जागावाटप, राज्यात मुख्यमंत्री आणि घटक पक्षांची जबाबदारी घेणार नाही या अटीशर्तींमुळे भाजपच्या समोरचा पेच वाढताना दिसतोय. मात्र सेना आपल्या बार्गेनिंग पॉवरचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.


हल्ल्यानंतरही युतीचं गुराळ सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांवर टीकेची झोड

भाजपाने मातोश्रीवर जात चर्चा करत एक पाऊल पुढे टाकलं आहे. शिवसेनेलाही युती करण्यासाठी सोयीस्कर कारण द्यावं लागणार आहे. मात्र आज पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही युतीचं गुराळ सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आणि पुन्हा एकदा युतीच्या घोषणेचा मुहूर्त हुकला. आता मुख्यमंत्री अमित शहा यांच्याकडे सेनेच्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवतील आणि शेतकरी, हिंदुत्व किंवा सन्मानजनक तोडगा अशा गोंडस नावाखाली युतीच्या पॅच अपची घोषणा करतील.


शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. युतीसाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता.

युतीसाठी अल्टीमेटम देताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ असून आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल," असे म्हणत राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिवसेनेकडून 1995 च्या फॉर्म्यूलावर जोर दिला जात आहे. विधानसभेच्या 150 जागा आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केली आहे. लोकसभेसाठी शिवसेनेकडून पालघर, भिवंडी, दिंडोरी, जळगावपैकी काही मतदारसंघांची मागणी केली आहे. तसेच लोकसभेसाठी 23/25 जागांबाबत चर्चा सुरु आहे. परंतु राज्यसभेची एक जागा द्यावी अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा शिवसेनेला सोडण्यात याव्यात. विधानसभेला 150 जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हव्या. केंद्रात एनडीएचं सरकार आल्यास पंतप्रधान भाजपचा असेल मात्र राज्यात युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केले होते.