मुंबई : सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. आज अखेर यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेला खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल. सारथीची बैठक आज पार पडली. सर्व महत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 'बैठकीत काहीही गोंधळ झालेला नाही. तसं असतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो', असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडी सरकारनं 'सारथी' संस्थेकडं दुर्लक्ष केलं असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचं संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं. सारथी संस्थेबाबतचा पोरखेळ थांबवा, सरकारच्या आश्वासनांचं काय झालं? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती. संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजातील महत्वाच्या प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

सारथीसंदर्भात बैठकीत गोंधळ; खासदार छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान

सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला. यादरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. अशातच या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला. दरम्यान, सभागृहात झालेल्या गोंधळानंतर बैठक सभागृहात न घेता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात संभाजीराजे छत्रपतींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,  माझ्या हॉलमध्ये सगळी लोक बसू शकत नाहीत. त्यामुळे हॉलमध्ये गेलो होतो. पण, चांगला निर्णय घेणं महत्त्वाचं की त्याला वेगळे फाटे फोडायचे हे बघा. ते म्हणाले की, आता दर दोन महिन्यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. सारथी संस्था चांगल्या पद्धतीनं काम करेल. आजच्या बैठकीत त्या अनुषंगानं सकारात्मक चर्चा झाली आहे. सारथी संस्थेनं केलेला सगळा खर्च संस्थेच्या वेबसाईटवर देण्याची सूचना केली आहे, असं अजित पवार म्हणाले.