मुंबईत झोपडपट्टींपेक्षा इमारतींमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती जास्त
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 06:55 PM (IST)
मुंबई : मुंबईत झोपडपट्टींपेक्षा इमारतींच्या परिसरात डेंग्यू पसरविणा-या डासांची उत्पत्तीस्थाने चौपट असल्याचे महापालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. महापालिकेकडून डासांच्या उत्पत्तीस्थानांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीच्या तापाने नागरिक आजारी पडू लागले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फिव्हरमुळे जवळपास 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. मुंबई महापालिकेने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 74 लाख 78 हजार 556 घरांची संयुक्त तपासणी केली. या तपासणी दरम्यान झोपडपट्टी परिसरात ‘एडिस एजिप्ताय’ डासांची 1 हजार 828 उप्तत्तीस्थाने आढळून आली आहेत. तर इमारतींच्या परिसरात 7 हजार 118 उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. म्हणजेच झोपडपट्टी परिसरांच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात सुमारे ‘एडिस एजिप्ताय’ डासांची उत्पत्तीस्थाने तब्बल चार पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. महापालिकेने याबाबत 13 हजार 593 नोटीस देण्यात आल्या. तर 927 प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याच आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान 26 लाख 92 हजार रुपये एवढा दंड कायदेशीर प्रक्रियेनुसार वसूल केला आहे.