Andheri Gokhale Bridge Demolition: अंधेरीतील (Andheri News) गोखले ब्रीजच्या (Gokhale Bridge) पाडकामाला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. अंधेरी पूर्व (Andheri East) पश्चिमेला (Andheri West) जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला. हा पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात रात्रीपासूनच सुरुवात झाली असून 13 तारखेपर्यंत रात्रीच्या वेळी चार तासांच्या मेगाब्लॉक (Mega Block) दरम्यान या पुलाचं तोडकाम केलं जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेनं (Western Railway) रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. या तोडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात पोकलेन, जेसीबी, डंपर यासोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील उपलब्ध करून दिलं गेलं आहे.


7 नोव्हेंबर 2022 पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं तब्बल 20 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात रात्रीपासून या तोडकामास सुरुवात केली आहे. या ब्लॉक दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12.15 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत तर हार्बरच्या अप आणि डाऊन दोन्ही मागांवर रात्री 12.45 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.


गोखले पूल पाडण्यासाठी मेगाब्लॉकदरम्यान गाड्यांच्या वेळत बदल



  • विरार ते चर्चगेट रात्री 11.40 आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री 12.46 ची लोकल गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गांवरून धावणार

  • अंधेरी ते विरार लोकल पहाटे 4.40 वाजता सुटणार


दरम्यान, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीनं गोखले ब्रिज अत्यंत महत्त्वाचा. वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना वाहतूक कोंडीत ढकलल्यानंतर मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासन यांच्यात ब्रिजच्या रेल्वे लाईनवरील भाग कोण पाडणार? यावर 'तू तू मैं मैं' करायला सुरुवात झाली होती. गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेनं या ब्रिजचा पश्चिम रेल्वे लाईनवरील भाग पाडण्याची तयारी करावी, या आशयाचं पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिलं होतं. त्यावर या संपूर्ण ब्रिज पाड काम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. अखेर याप्रकरणी एक सुवर्णमध्य काढत ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे.