नवी मुंबई : ऑनलाईन साईटवर जावून ॲार्डर दिल्यानंतर अनेकांच्या पदरी बनावट वस्तू मारल्याच्या तक्रारी या आदी अनेक वेळा घडलेल्या आहेत. मात्र फ्लिपकार्ट ॲानलाईन कंपनीच्याच गळ्यात चक्क बनावट वस्तू मारण्याचा प्रताप समोर आला आहे. महागड्या वस्तू चुकीच्या पत्त्यावर मागवून त्या प्रत्यक्ष ग्राहकांना न देता मध्येच हडप करून लाखो रूपयांचा चुना डिलिव्हरी बॉयने फ्लिपकार्ट कंपनीला लावला आहे. संघपाल मोरे असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.


ऐरोली येथे राहणारा आरोपी संघपाल मोरे हा फ्लिपकार्ट कंपणीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करत होता. आपल्या मित्रांना घेवून तो बनावट पत्त्यावर महागडे मोबाईल, लॅपटॉप, टॅब, घड्याळे, ट्रॅव्हल्स बॅग आदी सामान मागवत असे. प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्यासाठी सामान घेवून गेल्यानंतर दिलेला मोबाईल नंबर स्विचॲाफ करून ठेवत होते. तीन वेळा जावूनही ग्राहक मिळाले नाही असे दाखवून मागवलेल्या वस्तू तीन आरोपी काढून घेत असत.


यानंतर पार्सलमध्ये साबन , कांदा बटाटा भरून ते पार्सल कमीत जमा केले जात होते. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर केलेल्या तपासात आरोपींनी बनावट पत्ता देवून 8 लाख 24 हजारांच्या महागड्या वस्तू लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डिलिव्हरी बाॅय बरोबर इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.