Residential Doctors on Strike : राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. नीट पीजी काऊन्सिलिंग (NEET PG 2021 Counselling) प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील निवासी डॉक्टरांनी 27 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. या आंदोलनात आता राज्यातील  निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड देखील सहभागी झाली आहे. 


मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाबाहेर निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले.  रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे.  त्यामुळे सध्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर अधिक ताण येत आहे. त्यामुळे केंद्रावर रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी प्राध्यापक वर्ग आणि इतर डॉक्टर्स काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


निवासी डॉक्टरांच्या संपाची दखल राज्य सरकारनेदेखील घेतली आहे. राज्य सरकारकडून निवासी डाॅक्टरांच्या शिष्टमंडळाला समस्या समजून घेण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या उपस्थिती संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. राज्य सरकारनं केंद्राला पत्र पाठवावे आणि पीजी-नीट काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीनं व्हावी अशी मागणी निवासी डाॅक्टरांनी राज्य सरकारला केली आहे. 


निवासी डाॅक्टरांचा नेमका प्रश्न काय ?


देशात निवासी डॉक्टरांच्या एकूण 50 हजार जागा आहेत. राज्यात निवासी डॉक्टरांच्या पहिल्या वर्षाच्या एकूण अडीच हजार जागा आहेत. राज्यात साडे पाच हजारच्या जवळपास निवासी डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. मात्र पीजी-नीटच्या जागा अद्यापही न भरल्याने निवासी डॉक्टरांवर अधिकचा ताण आला आहे. 


मुंबईत काय स्थिती ?


मुंबईत फक्त ४०० निवासी डॉक्टरांवर रुग्णालयांचा भार आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवा देताना अडचणी येत असल्याचं निवासी डॉक्टरांनी म्हटले. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha