मुंबई : विधानपरिषदेसाठी संधी न मिळाल्यामुळे शिवसेना आमदार, आरोग्यमंत्री दीपक सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज झालेले सावंत सहा तारखेनंतर पावसाळी अधिवेशनाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


शिवसेनेकडून मनिषा कायंदे आणि अनिल परब यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. संधी डावलली गेल्यामुळे दीपक सावंत नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या विलास पोतनीस यांच्यासाठी काल आयोजित झालेल्या कार्यक्रमालाही दीपक सावंत यांना आमंत्रण दिलं नव्हतं.
काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट

दीपक सावंत यांनी याआधीच मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री आणि पक्षाकडे सोपवला आहे. दीपक सावंत पुढील सहा महिने मंत्रिपदावर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिवसेनेचं आरोग्य खातं कोणाकडे जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.