मुंबई : सीएसटी स्थानकावरचं विश्रांतीगृह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची भीती निर्माण झाली आहे. विश्रांतीगृहात प्रतीक्षा करणाऱ्या एका दाम्पत्यातील महिलेचा पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
झिया रेहमान आणि नाझिया खातून 22 एप्रिलला बंगालहून मडगाव एक्स्प्रेसने मुंबईत आले. सीएसटीवरच्या विश्रांतीगृहात ते काही वेळ थांबले होते. रेल्वेच्या पॅन्ट्रीमधूनच त्यांनी व्हेज बिर्याणी घेतली. मात्र रुममध्ये दोन तास थांबल्यानंतर त्यांना मळमळ, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला.
तक्रारीनंतर त्यांना रुम बदलून मिळाली पण नाझिया बेशुद्ध पडल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नाझिया यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. झिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस या प्रकाराची कसून चौकशी करत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.
संबंधित रुममध्ये एका आठवड्यापूर्वी म्हणजे 13 एप्रिलला पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. तसंच या घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजे 22 तारखेला या रुममध्ये थांबलेल्या आणखी एका जोडप्याला असाच त्रास झाला होता.