मुंबई : महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत भाजपनं मुंबई पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. ‘एकमेव ध्येय मुंबईची प्रगती’ असं घोषवाक्य घेऊन भाजपनं महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम आखले आहेत.

 

मुंबई भाजपातर्फे 227 वॉर्डमध्ये भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यामध्ये प्रभात फेरी, शोभा यात्रा, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, महाराष्ट्राची लोकधारा सांगणाऱ्या गीतांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

 

येत्या वर्षभरात मुंबई पालिकेची निवडणुक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं ही तयार केली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

मुंबईतील २०० हून अधिक चौक सजवण्यात येणार असून केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी जे महत्वाचे प्रकल्प आणि कामे केली आहेत, त्यांची सविस्तर माहिती यानिमित्ताने जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई विमानतळावरील पुतळ्याच्या परिसरात भव्य असा सेट, प्रकाशयोजना आणि साजवट करून 30 एप्रिल रोजी रात्री 9 ते 10 या वेळेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम होईल.