मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जप्त केलेल्या मुंबईतील तिन्ही संपत्तींचा आज लिलाव झाला. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ही संपत्ती 11.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. या संपत्तींमध्ये रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसचा समावेश आहे.

चर्चगेटच्या आयएमसी बिल्डिंगमधील किलाचंद कॉन्फरन्स रुममध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव झाला.

दाऊदच्या कोणत्या संपत्तीचा लिलाव?

- डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
किंमत - 3 कोटी 54 लाख रुपये

- हॉटेल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
किंमत - 4 कोटी 52 लाख 53 हजार रुपेय

- शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
किंमत - 3 कोटी 52 लाख रुपये

चक्रपाणी यांना लिलावात अपयश
हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हेदेखील दाऊदची संपत्ती खरेदी करण्याच्या तयारीत होते, पण त्यांना यश आलं नाही. दाऊदची संपत्ती खरेदी करुन त्यावर शौचालय बनवणार असल्याची घोषणा स्वामी चक्रपाणी यांनी केली होती.

याआधीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव
लिलावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. 2015 मध्येही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. मागील वर्षी पत्रकार एस बालाकृष्णन यांनी रौनक हॉटेलसाठी 4 कोटी 28 लाख रुपयांची बोली लावली होती. पण 30 लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित 4 कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा त्याचा लिलाव झाला.

मागील लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी  32,000 रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.