मुंबई : दिल्लीतील तिहार जेलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला संपवण्याचा प्रयत्न डी कंपनी करत होती. गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर डी कंपनीचा हा प्रयत्न फसला.
दिल्लीतील कुख्यात गँगस्टर नीरज बवाना आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांना तिहार जेलमध्ये एकाच सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र गुप्तचर यंत्रणांना डी कंपनीच्या कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर, नोव्हेंबर महिन्यातच गँगस्टर नीरज बवानाची तिहार जेलमधील कोठडी बदलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नीरज बवाना हा उत्तर भारतातील कुख्यात गुंड आहे. तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याला डी कंपनीकडून म्हणजेच दाऊदकडून छोटा राजनच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.
तिहार जेलमध्ये राजनला अत्यंत कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. कारण याआधीही राजनवर गँगवॉरमध्ये दाऊद गँगकडून हल्ले झाले आहेत. इंडोनेशियातील बालीमध्ये राजनला ज्यावेळी अटक करण्यात आली, त्यावेळीही छोटा शकील आणि दाऊदकडून राजनवर हल्ल्यासाठी हालचाली करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, आता आधीच माहिती कळल्याने छोटा राजनच्या सुरक्षेसाठी नीरज बवाना आणि राजनचे सेल बदलण्यात आले. त्याचसोबत, यंत्रणांकडून यासंदर्भात चौकशीही सुरु करण्यात आली आहे.