Shivsena Dasara Melava 2022 : यंदा शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा होणार? ठाकरेंचा की, शिंदे गटाचा? यावरुन राजकारण चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने (Shiv Sena) हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. परंतु, शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती सूत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र दोन्ही गटांना दिली आहे.
मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी देता येईल का? यासंदर्भात अभिप्राय मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं मुंबई महापालिकेकडून पत्रात सांगितल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच दादर, प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिंकांनी केला होता. याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरुनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळेच कोणत्याही अर्जाला परवानगी दिली जाऊ नये, असा अभिप्राय मुंबई पोलिसांनी दिल्याचं सुत्रांनी सांगतिलं आहे.
दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? आणि झाला तर तो कोणाचा होणार? उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? याचं उत्तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. शिवसेनेकडून दावा केला जात आहे की, साल 1966 पासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर साजरा केला जात आहे. त्यामुळे त्यांना इथं परवानगी नाकारण्याचं कारण नाही. मात्र सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता, निव्वळ राजकीय दबावापोटी त्यांना परवानगी दिली जात नाही. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान घोषित झालं तेव्हा वर्षातले काही ठराविक दिवस इथं कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे, दुर्गापूजेनिमित्त बंगाल क्लबला दरवर्षी इथं परवानगी दिली जाते. कारण त्यांच्यासाठी या काळात मैदान राखीव असतं. त्याचप्रामणे 1 मे, 6 डिसेंबर आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा तसेच, दसऱ्याचा दिवस हा शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राखीव आहे. मात्र असं असतानाही जर ही परवानगी मिळत नसेल तर यात निश्चित राजकीय दबाव आहे, असा आरोप करत शिवसेनेच्या वतीनं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :