मुंबई : तुम्ही जर मासे खाण्याचे शौकीन असाल तर आफ्रिकन मांगूर माशापासून सावधान रहा.... कारण कॅन्सर, डायबिटीजसारख्या रोगांची लागण मांगूरमुळे होऊ शकते. या माशाचे पालन आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य सरकारची आता करडी नजर आहे. अशा घातक माशाला संपवण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पुढच्या दहा दिवसात आफ्रिकन मांगूर संपवण्याचं राज्य सरकारचं लक्ष्य आहे. आजपर्यंत राज्यात 30 टन मांगूर पकडून, मारुन त्याला जमिनीत दफन केलं आहे. मुंबईत 15 टन, इंदापूरमध्ये 8 टन तर भंडाऱ्यात 7 टन मांगूर मासा पकडला आहे.


मांगूर मांसाहारी मासा आहे, तो पाण्यातील जीवजंतूंना खातो, त्यामुळे इको सिस्टीम बिघडते. मांगूर पाण्यातला ऑक्सिजनही घेतो. त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होते. ज्यादा पैसे कमावण्याच्या उद्देशाने काही लोक मांगूरचे पालन करतात, कारण चार महिन्यात मांगूर मासा तीन किलोपर्यंत वाढतो. सरकार आता मांगूर माशाबद्दल जनजागृती मोहीम उघडणार आहे, मत्स्यविक्रीच्या ठिकाणी पोस्टर लावणार आहे.

मुंबईच्या फिश मार्केटमध्ये मांगुर मासा विकला जाऊ नये याची दक्षता इथल्या मत्स्य विक्रेत्यांनी घेतलेली आहे. मत्स्य विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांनी देखील मांगूर मासा खाऊ नये असं आवाहन मत्स्य विक्रेते आणि द मुंबई फ्रेश फिश डीलर असोसिएशनचे सचिव विलास पाटील यांनी केलं आहे.

केंद्र सरकारने 1998 पासून मांगूरचे पालन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. आता राज्य सरकारने ही हा मासा हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता नागरिकांनी देखील जागृत राहून याला प्रतिसाद दिला तर हा मासा कायमचा नष्ट होईल.

काही दिवसांपूर्वी इंदापुर तालुक्यातील कालठण इथे अवैध पद्धतीने मांगूर करत असलेल्या साठ्यावर मत्स्य विभागाची मोठी कारवाई केली होती. मत्स्यविभागाने शेकडो किला मांगूर मासा जप्त करुन नष्ट केला. या कारवाईमउळे अवैधरित्या मांगूर माशाची पैदास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.