उल्हासनगर : पोलिसांच्या आशिर्वादाने उल्हासनगरमध्ये डान्सबार सुरुच असल्याचं पाहयला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने उल्हासनगरमधल्या डान्सबारचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर कारवाई केल्याचा दिखावा केला. पण यानंतर पाठपुरावा केला असता आचल पॅलेसमधल्या बारमध्ये सगळं काहीखुलेआमपणे सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
याबद्दलचे काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दाखवले आणि तक्रारही केली. मात्र आम्हाला त्या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही आढळलं नाही, असं एसीपी विकास तोटावार यांचं म्हणणं आहे. पण मग याच आचल पॅलेस बारमधले विश्वास माळगावकर यांनी दिलेले व्हिडीओ खोटे आहेत का? याचं उत्तर मात्र पोलिसांकडे नाही. त्यामुळे या सगळ्याला पोलिसांचाच आशिर्वाद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
उल्हासनगर शहरात आजच्या घडीला अशाप्रकारचे किमान 12 ते 15 डान्सबार सुरू आहेत. कल्याण, शिळफाटा रोड, मानपाडा, कोनगाव, भिवंडी, माणकोली भागातही असंख्य डान्सबार सुरू आहेत. पण पोलिसांना ते दिसत नाहीत. त्यामुळे 'अंगाशी आल्यावर दखल घेणारे' उल्हासनगरचे पोलीस आता तरी या डान्सबारवर कारवाई करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.