मुंबई: ऐन दिवाळीच्या तोंडावर  स्वयंपाकघरातील डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरभरा डाळीचे दर जवळपास दुप्पट वाढले असताना, दुसरीकडे  डाळींच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने डाळींच्या साठेबाजारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.


राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्यावतीने राज्यात एकूण 389 धाडी घातल्या आहेत. यात डाळीचा अवैध साठा करणाऱ्या 529 जणांना अटक केली असून  230 जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल 2 कोटी 61 लाख 63 हजार 306 रुपयांची 72,600 किलो डाळ जप्त केली आहे.

दरम्यान, राज्यातील चणा डाळीचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार खुल्या बाजारात चणा डाळीची विक्री करणार आहे. यासाठी केंद्राला 700 मेट्रिक टन चणा देण्याची विनंती राज्य सरकारने केली आहे. ही डाळ ग्राहकांना 70 रुपये दराने मिळणार असल्याचं समजतं आहे.

पण ही डाळ बाजारात कधी येणार याबाबत संदिग्धता कायम असून दिवाळीअधी डाळ मिळणार का यावर सरकारकडून अद्याप ठोस उत्तर मिळू शकलेलं नाही.

संबंधित बातम्या

ऐन दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे दर दुप्पट