मुंबई : 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर कारवाईला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. सध्या मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबईतल्या 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांना नोटीस देऊन कारवाई सुरु केली आहे.


शिवसेनेनं आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विरोध दर्शवल्याचं बोललं जात आहे. तसंच सेनेनं 14 फुटांची मर्यादा 20 फुटांपर्यंत वाढवण्याची मागणीही केली आहे.

महापालिकेच्या या कारवाईला विधी समितीत विरोध दर्शवत शिवसेनेसह सपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही सभात्याग केला आहे. मात्र भाजपनं 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर कारवाईला समर्थन दिलं आहे.

झोपडपट्टीवरील कारवाईची मर्यादा ही ग्राऊंड प्लस वन पर्यंत शिथील करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. स्थायी समितीत सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी हरकतीचा मुद्दा मांडला आहे.

अनधिकृत बांधकामप्रकरणी राजकीय पक्षांची भूमिका

14 फुटांपेक्षा जास्त झोपड्यांवरच्या कारवाई झालीच पाहिजे अशी मनसेची भूमिका आहे.

प्रशासन कायद्याच्या कक्षेत कारवाई करत असेल तर प्रशासनाने कारवाई करायला हरकत नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. 14 फूटांवरील कारवाई टाळायची असेल तर राज्य सरकारकडे दाद मागावी, आयुक्तांना नियम बदलण्याचा अधिकार नाही अशी भूमिकाही भाजपने घेतली आहे.

शिवसेनेच्या प्रशासनविरोधी भूमिकेला भाजपने विरोध दर्शवला आहे.